प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून केली सोन्याची तस्करी; कस्टम अधिकाऱ्यांची मोठी कारवाई

जयपूर विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अबुदाबीहून आलेल्या एका व्यक्तीने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक किलोपेक्षा जास्त सोने लपवले होते. कस्टम अधिकाऱ्यांना याची आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे ही व्यक्ती विमानतळावर पोहोचलाच कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला अडवले. यानंतर तपासणीनंतर त्याच्या शरीरात सोन्याच्या कॅप्सूल लपवल्या गेल्याची खात्री झाली. यासंदर्भात पुढील कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र खान असे या आरोपीचे नाव असून तो राजस्थानमधील बेवार जिल्ह्यातील सरगाव गावात राहणारा रहिवाशी आहे. महेंद्र एतिहाद एअरवेजच्या विमानाने अबुदाबीहून जयपूरला पोहोचला होता. यावेळी महेंद्र खान प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवून आणले होते. मात्र कस्टम अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी महेंद्रला विमानतळावरच अडवले आणि त्याची झडती घेतली.

कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर महेंद्रचे एक्स-रे स्कॅन केले. यावेळी त्याच्या शरीरात काही कॅप्सूलसारखे दिसले. यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यानंतर कस्टम अधिकारी महेंद्रला जयपूर विमानतळाजवळ असलेल्या जयपूरिया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून महेंद्रच्या शरिरातून सोन्याचे 3 तुकडे काढले.

चौकशीत आरोपीने काय सांगितले?

कस्टम अधिकाऱ्यांनी महेंद्र खानची चौकशी केली असता त्याने स्थानिक पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सोने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपविल्याचे कबूल केले. महेंद्रच्या गुप्तांगातून जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे वजन एक किलोपेक्षा जास्त असून, त्याची अंदाजे किंमत सुमारे 90 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.