माळशेज घाटरस्ता फाटला, प्रवाशांची हाडे खिळखिळी; ठिकठिकाणी खड्डे, संरक्षक भिंतीही तुटल्या

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड हद्दीतील माळशेज घाट धोकादायक बनला आहे. वळणावळणावरील संरक्षक भिंती तुटल्या असून दगडी बांध गायब झाले आहेत. वेगमर्यादा नियंत्रणात आणण्यासाठी असलेले पांढरे पट्टे, दिशादर्शक फलकही गायब झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांची हाडे खिळखिळी होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे माळशेज घाटातून जाताय तर सावधान… काळजी घेऊन गाडी चालवा.

  • माळशेज घाटरस्ता हा कायम मृत्यूचा सापळा झाला असून हा घाट नागमोडी वळणाचा आहे. घाटातील संरक्षक भिंती तुटल्यामुळे रस्ता खचता चालला आहे.
  • घाटात संध्याकाळी 7 ते सकाळी 8 वाजेपर्यंत दाट धुक्याने वाट हरवली जाते. त्यातच कधीही कोसळतील असे कडे, घाट परिसरातील रस्त्यावर सर्वत्र झालेली चाळण अशा परिस्थितीता गाडी चालवायची की खड्डा चुकवायचा असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.
  • घाटातून रात्रीचा प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण ठरत आहे. कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक 222 वरून 61 नामकरण केले असले तरी रस्ते धोकादायक आहेत.

साक्षात मृत्यूचीच सोबत

घाटात दरवर्षी धोकादायक कड्यावर जाळ्या बसवणे, रस्ता काँक्रीट करणे, संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, खड्डे भरणे यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. घाटातून रात्रीच्या सुमारास शेकडो मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची ये-जा असते. मात्र रस्त्यावर खड्डे, डोक्यावर कोसळण्याच्या स्थितीत असलेले कडे, दाट धुके यामुळे घाटात वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला सोबत घेऊन प्रवास करण्यासारखे आहे.