पश्चिम बंगालमधील दुर्घटनेला कोण जबाबदार? पंतप्रधान की रेल्वेमंत्री? काँग्रेसचे मोदी सरकारला 7 सवाल

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातावरून काँग्रेसने सवाल उपस्थित केले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दार्जिलिंगमधील रेल्वे अपघातावरून मंगळवारी नरेंद्र मोदी सरकारला सात सवाल केले. रेल्वे प्रशासनाचा हा गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा आहे, असा आरोप केला आहे. या रेल्वे दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत.

रेल्वे दुर्घटनेवरून मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले आहे. मोठी दुर्घटना झाली की विद्यमान रेल्वेमंत्री कॅमेऱ्यांच्या लवाजम्यासह घटनास्थळावर दाखल होतात. असं वागतात जसं सर्वकाही आलबेल आहे. पंतप्रधान मोदींनी सांगावं, या घटनेला जबाबदार कोण? तुम्ही की रेल्वेमंत्री? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटमधून सात प्रश्न विचारले आहे. या प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारला द्यावीच लागतील, असे खरगे म्हणाले. खरगे यांनी विचारलेले सात प्रश्न पुढील प्रमाणे…

1 – बालासोरमधील भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर बहुचर्चित कवच सुरक्षेत एकही किलोमीटर भाग का जोडण्यात आला नाही?
2 – रेल्वेत किमान 3 लाख पदे रिक्त आहेत. ही पदे गेल्या 10 वर्षांत का भरली नाहीत?
3 – NCRB (2022) च्या रिपोर्टनुसार वेगवेगळ्या रेल्वे दुर्घटनांमध्ये 2017-2021 या कालावधीत 1 लाख नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांना जबाबदार कोण? मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे लोको पायलटना अनेक तास काम करावे लागते. अपघाताच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण हेच आहे, असे रेल्वे बोर्डानेही मान्य केले आहे. मग ही पदं का भरली नाहीत?
4 – संसदेच्या स्थायी समितीने आपल्या 323 व्या रिपोर्टमध्ये रेल्वे सुरक्षा आयोगाने (CRS) केलेल्या शिफारशींकडे रेल्वे बोर्डाने केलेल्या दुर्लक्षावरून टीका केली होती. फक्त 8 ते 10 टक्के अपघातांची चौकशी होते. मग CRS ला अधिक भक्कम का करत नाही?
5 – CAG नुसार राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष (RRSK) 75 टक्के फंडिंग कमी का केली गेली? हा निधी रेल्वे अधिकारी अनावश्यक गरजांसाठी आणि सुविधांसाठी का वापरत आहेत?
6 – सामान्य स्लीपर क्लासने रेल्वे प्रवास करणं इतकं महाग का झालं आहे? स्लीपर कोचची संख्या का कमी केली गेली?
7 – जबाबदारी झटकण्यासाठी रेल्वे बजेटचा सामवेश सर्वसामान्य बजेटमध्ये केला होता का? जनतेला यावर उत्तर हवे आहे.