साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्याविरोधात वॉरंट जारी, विशेष न्यायालयाने फेटाळली पंचकर्माची सबब

पंचकर्माचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे सुनावणीला हजर न राहण्याची मुभा द्यावी, ही भाजप नेत्या व माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची विनंती विशेष न्यायालयाने फेटाळून लावली. 13 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या सुनावणीला साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना हजर रहावेच लागेल, असे सक्त आदेश देत विशेष न्यायालयाने त्यांच्याविरोधात दहा हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले.

मालेगाव 2008 बॉम्बस्फोट खटल्यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या मुख्य आरोपी आहेत. या खटल्याची अंतिम सुनावणी सुरू आहे. अंतिम सुनावणीला आरोपी कोर्टात असणे आवश्यक आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या उपस्थितीसाठी जामीनपात्र वॉरंट जारी केले जात आहे, असे विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा जण ठार झाले तर 100हून अधिक जण जखमी झाले होते. एटीएसने धडक कारवाई करत साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरसह अन्य आरोपींना अटक केली. या बॉम्बस्फोटामुळे हिंदू दहशतवाद हा नवीन ट्रेंड समोर आला. नंतर याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.

जून महिन्यापासून गैरहजर

साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या 4 जून 2024पासून सुनावणीला हजर राहत नाही आहेत. त्यांच्या आजारपणाचे व रुग्णालयात दाखल असल्याचे कारण वेळोवेळी दिले जात आहे. ते न्यायालयाने मान्यही केले. आता त्यांच्यावर पंचकर्माचे उपचार सुरू आहेत. या उपचाराची सत्य प्रत सादर झालेली नाही. केवळ फोटो कॉपी अर्जासोबत जोडण्यात आली आहे, असेही विशेष न्यायालयाने नमूद केले.