महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. या अहवालात चित्रपटसृष्टीतील महिलांसोबत होणारे गैरवर्तन, लैंगिक शोषण आणि शारीरिक छळ याबाबत खुलासा केला आहे. आता मल्याळम सोबतच तमिळ आणि इतर फिल्म इंडस्ट्रीतील महिलांनी याबाबात मते व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.
एका मुलाखतीत मल्याळम अभिनेत्री सौम्याने लहानपणी तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारावर भाष्य केलं. ‘मी 18 वर्षांची होते. ते माझे कॉलेजचे पहिले वर्ष होते. यावेळी मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र माझ्या आई-वडिलांना चित्रपटांची माहिती नव्हती. तामिळ चित्रपटात काम करण्याची ही संधी मला कॉलेजमधून मिळाली. यावेळी दिग्दर्शक मला घेण्यासाठी पत्नीसोबत आला होता. मी पहिल्या दिवसापासून त्या व्यक्तीसोबत अस्वस्थ वाटायचे. मात्र आपल्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळतेय ही माझ्यासाठी महत्वाची बाब होती. तेव्हा या दिग्दर्शकाने मला मुलगी मानले होते. परंतु त्यांचे चारित्र्य चांगल नव्हत. असे सौम्या एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
सौम्याच्या म्हणण्यानुसार, दिग्दर्शकाला एक मुलगी होती जिने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर घर सोडले होते. मात्र दिग्दर्शकाने मुलीला खोटे ठरवले होते. ‘एक दिवस त्यांची पत्नी घरी नसताना त्याने मला मुलगी-मुलगी म्हणत चुंबन घेतले. यावेळी मी घाबरले होते. हा सगळा प्रकार मला माझ्या मित्रांना सांगायचा होता पण ते शक्य झाले नाही. मला लाज वाटली, तेव्हा माझ्या मनात अनेक विचार आले. पण या सगळ्यावर मात करून मी त्याच्याशी चांगले वागायचे असं ठरवलं.
दिग्दर्शकाच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी माझ्या कामावर लक्ष दिलं. मात्र याचाच गैरफायदा त्याने घेतला. त्यानंतर त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि माझ्यावर बलात्कार केला. कॉलेजमध्ये असताना हे सगळं वर्षभर चाललं. तो नेहमी मला त्याची मुलगी म्हणायचा मात्र त्याने मला मुलीसारखे कधी वागवले नाही. तो नेहमी माझ्यावर अत्याचार करायचा. मी या काळात अनेकवेळा अत्याचार सहन केला. मात्र याबाबत काही बोलायची कधी हिंमत झाली नाही. या सगळ्यातून सावरायला मला 30 वर्षे लागली, असे सौम्या म्हणाली. अभिनेत्री सौम्याने मुलाखतीदरम्यान दिग्दर्शकाचे नाव सांगितले नाही.