महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आरोप करणाऱ्या महायुतीलाच सर्वाधिक मुस्लिम मतं! लोकसभेची आकडेवारी आली समोर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने सर्वाधिक मतं दिली, असा जावईशोध उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लावला होता. मात्र, ज्या मतदारसंघात महायुतीचे उमेदावर निवडून आले आहेत, तिथे सर्वाधिक मुस्लिम समाजाने महायुतीच्या पारड्यात मतं टाकल्याचे समोर आले आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे. एक्सप्रेसच्या वृत्तानुसार 38 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत याच 38 विधानसभा मतदारसंघातून महायुतीला लोकसभा निवडणुकीत भरभरून मतं मिळाली आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या 38 जागांवर महायुतीला जास्त मतं मिळाली आहेत.

राज्यात 288 विधानसभा मतदारसंघ असून 38 विधानसभा मतदारसंघात 20 टक्के लोकसंख्या ही मुस्लिम समाजाची आहे. तर याच 38 पैकी 9 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारसंघाची लोकसंख्या ही 40 टक्के आहे. 2011 च्या जनगणेनुसार राज्याची लोकसंख्या 11.24 टक्के असून त्यात मुस्लिम समाज 1.3 कोटी इतके आहेत. राज्यात एकूण लोकसंख्येपैकी 11.56 टक्के संख्या ही मुस्लिम समाजाची आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत या 38 मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी 11 उमेदवार विजयी झाले होते. तर 9 शिवसेना, 3 राष्ट्रवादी आणि एमआयएम आणि सपाचे प्रत्येकी दोन आमदार निवडून आले होते. 38 विधानसभेच्या जागांमध्ये मुस्लिम मतदार लक्षणीय असले तरी या 38 पैकी फक्त 10 जागांवर मुस्लिम उमेदवार निवडून आले होते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला होता. पण व्होट जिहादमुळे महाविकास आघाडीचा विजय झाल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला होता. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालात विधानसभानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की महायुतीच्या उमेदवारांना मुस्लिम मतदारांनी भरभरून मतं दिली होती. 38 पैकी 20 मतदारसंघात महायुतीच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसले आहे, असे ‘इंडियन एक्सप्रेस’ने वृत्तात म्हटले आहे.

रावेरमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला होता. पण लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपला 20.13 टक्के मतं मिळाली होती. मानखुर्द, भिवंडी पश्चिम, भायखळा, संभाजीनगर मध्य, अकोट, परभणी आणि बीड या मतदारसंघात महायुतीच्या मतांमध्ये 10 टक्क्यांनी घट झाली आहे.