महायुती तीनअंकी आकडाही गाठणार नाही! पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. 65 टक्के जागा आम्ही जिंकलो. या गोष्टीचा विचार केला असता विधानसभेत आम्ही 183 जागा जिंकत आहोत. खरे तर आम्ही त्यापेक्षाही जास्त जागा जिंकणार आहोत. मात्र, महायुती विधानसभा निवडणुकीत तीन अंकी आकडा गाठते की नाही, अशी परिस्थिती आहे, असे भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले.

कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी, पुणे व पिंपरी-चिंचवड रहिवासी यांच्यातर्फे निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार समिरण वाळवेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. त्यावेळी चव्हाण बोलत होते. महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम उपस्थित होते.

मुलाखतीत चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सामाजिक वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात बारा बलुतेदार समाज, मराठा समाज, दलित समाज खेळीमेळीत राहत असे. त्यांच्यात कधीही तेढ निर्माण होत नव्हता. मात्र, आता तसे वातावरण राहिले नाही. काही राजकीय पक्ष या समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. दलित समाजात बौद्ध दलित आणि हिंदू दलित अशी विभागणी करून त्यांच्यातही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकंदरीतच निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडविण्याचे काम सुरू आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राजकारणाची दिशा मतदार बदलतील! बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन

आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, “मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचे काम मी मुख्यमंत्री असताना झाले. मात्र, नवीन सरकारला हे आरक्षण टिकविता आले नाही. सध्या राज्यात बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न आहे. लोकांच्या हाताला कामच नाही. गेल्या दहा वर्षांत एकही मोठा उद्योग, आयटी कंपनी राज्यात आली नाही. जे उद्योग येत होते, ते गुजरातला पळविले गेले. महाराष्ट्रातील वातावरण उद्योगस्नेही नाही, अशी परस्थिती निर्माण करण्यात आली आहे. बेरोजगारीमुळेच आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिंध्यांना महाडमध्ये चवदार तळ्याचे पाणी पाजणार! सुषमा अंधारे यांचा इशारा