डरपोक सरकार सिनेटच्या निवडणुकीलाही घाबरतंय; आदित्य ठाकरे यांचा महायुतीवर हल्लाबोल

मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक चर्चेत होती. निवडणुकीच्या अवघ्या 24 तास आधी ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. तसेच ही निवडणूक टाळण्यासाठी मिंधे सरकारकडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.राज्यात घटनाबाह्य आणि घाबरट मुख्यमंत्री आहेत. त्यांना सिनेट निवडणूक आणि युवासेनेची प्रचंड भिती वाटत आहे. त्यामुळे ही निवडणूक होऊ नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आज होत असलेल्या मतदानासाठी आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाचे आभार मानले. मिंध्यांना सुशिक्षित मतदारांची भिती वाटत आहे. डरपोक सरकार सिनेट निवडणुकीलाही घाबरत आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचे सर्व मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.