बीड जिह्यातील आष्टी मतदारसंघात महायुतीत मोठा वाद उफाळून आला आहे. भाजप आणि अजित पवार गटात हा वाद उफाळून आला असून अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. आष्टी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुरेश धस हे लवकरच शरद पवार यांच्या तुतारीचा प्रचार करताना दिसतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. आष्टी मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपने सुरेश धस यांना रिंगणात उतरवले, तर अजित पवार गटाने विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी दिली. एकाच मतदारसंघात दोन-दोन उमेदवार देण्यात आल्याने महायुतीची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे तर आष्टीत तुतारीची जबरदस्त हवा आहे.