महाविकास आघाडीत वेगवान हालचाली, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक

लोकसभा निवडणुकीची घोषणा व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत वेगवान हालचाली सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा केली.

देशभरातील विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत भाजपविरोधात लोकसभा निवडणूक लढविणाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या 48 जागा लढविण्यात येणार आहेत. जागावाटपाची चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसोबत उद्या बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद्रचंद्र पवार), कॉँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये कोण किती जागा लढवणार यापेक्षा भाजपला हरवायचे आणि राज्यात व देशात लोकशाही, संविधान आणि वंचितांचे रक्षण करणे हा प्रमुख अजेंडा समोर ठेवून चर्चा करण्यात आली.

लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कॉँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात उद्या बैठक होणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

राज्यभरात संयुक्त बैठका, 7 मार्चपर्यंत विधानसभानिहाय तर 10 मार्चपर्यंत लोकसभानिहाय बैठका घेण्याचे आदेश
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने पंबर कसली आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित करण्यासाठी घटक पक्षांच्या पदाधिकाऱयांमध्ये योग्य समन्वय रहावा यासाठी राज्यभरात संयुक्त बैठका घेण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. 7 मार्चपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय तर 10 मार्चपर्यंत लोकसभा बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने यासंदर्भात शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱया आहेत. बैठकांमधील कार्यवाहीची माहिती संबंधित पदाधिकाऱयांनी आपापल्या पक्षप्रमुखांना द्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना कोणत्याही क्षणी जाहिर होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीचा विजय हीच आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वांनी संपूर्ण ताकदीने व मतभेद विसरून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकऱयांची एकत्रित जिल्हानिहाय संयुक्त बैठका तातडीने घेणे आवश्यक आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक मित्रपक्षांच्या पदाधिकाऱयांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचा विजयच महाराष्ट्राला संपूर्ण देशात वेगळी ओळख निर्माण करून देईल, असेही पुढे म्हटले आहे.