महाविकास आघाडीची बैठक, जागावाटपाचा तिढा सुटला

आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटप तसेच पुढील रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक आज पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन जागावाटपाचा तिढा सुटला. आघाडीची पुढील बैठक येत्या शनिवारी होणार आहे.

महाविकास आघाडीची बैठक हॉटेल पह्र सिझन्समध्ये आज पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली.

प्रकाश आंबेडकर यांच्या चेहऱयावर हास्य
बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांना प्रसारमाध्यमांनी जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली का? तुम्ही समाधानी आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर माझ्या चेहऱयावरून तुम्हाला काय वाटतेय, असा प्रतिप्रश्न आंबेडकर यांनी हसतमुख चेहऱयाने केला. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनीही सकारात्मक, सकारात्मक असे म्हटले आणि आंबेडकर यांच्या चेहऱयावर पुन्हा हास्य उमटले. किती जागा मागितल्या या प्रश्नावर बोलताना पुढील बैठकीत सर्व गोष्टी ठरतील, असे ते म्हणाले.

एकाही जागेवर मतभेद नाही
बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभेच्या सर्व 48 जागांवर या बैठकीत आघाडीतील चार पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. एकाही जागेविषयी आघाडीत मतभेद नाहीत आणि सर्वांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले आहे, असे संजय राऊत म्हणाले. कुठल्या पक्षाच्या किती जागा असतील याविषयीची घोषणा आम्ही एकत्र बसून करू, असेही त्यांनी सांगितले.