लोकशाहीत जनतेचा आंदोलन करण्याचा अधिकार का डावलला जात आहे? संजय राऊत यांचा परखड सवाल

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानप्रकरणी रविवारी महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त करत जोडो मारो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी हे आंदोलन होणारच, जनता त्यांच्या मनातील सरकारविरोधातील रोष व्यक्त करणारच, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही, तसेच शांततेने करण्यात येणाऱ्या या आंदोलनासाठी परवानगी मागण्याचीही गरज नाही. त्यामुळे रविवारीही हे आंदोलन होणारच, असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीकडून रविवारी होणाऱ्या जोडो मारो आंदोलनाला परवानगी नाकरण्याचे काहीही कारण मुंबई पोलिसांकडे नाही. तसेच यासाठी परवानगी मागण्याचे कारण आम्हालाही नाही. आंदोलन रविवारी होत आहे. फोर्ट, गेट वे ऑफ इंडिया हा भाग सुटीच्या दिवशी शांत असतो. तिथे कोणत्याही घडामोडी नसतात. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्मांचे स्मारक म्हणजे हुतात्मा स्मारक आहे. तिथे एकत्र येण्यासाठी परवानगी का हवी, असा सवालही त्यांनी केला.

हुतात्मा चौकात हुतात्मांना वंदन करून आम्ही शांततेत गेट वे ऑफ इंडियाकडे जाणार असू, तर त्यासाठी परवानगीची गरज नाही. तसेच परवानगी मागितली असेल तर ती नाकरण्याला काहीही कारण नाही. लोकशाहीत आंदोलने करायची नाहीत का, जनतेने त्यांच्या भावना व्यक्त करायच्या नाहीत का, असा सावलही त्यांनी केला. त्यांना संविधान बदलायचे आहे, असा आरोप होतो. त्यात तथ्य आहे, हे यावरून दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानप्रकरणी आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या भावना व्यक्त करणार आहोत, हा गुन्हा आहे, असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी आम्हाला अटक करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. जे राज्य सरकार घटनाबाह्य आहे, जे राज्य सरकार छत्रपती शिवाजी माहाराजांचा अपमान उघड्या डोळ्यांनी बघत असतील, तर त्या राज्य सरकारला प्रतिमा आहे काय, असा हल्लाबोल ही त्यांनी केला.

त्यांनी माफी मागितली त्यामुळे प्रश्न सुटत नाही, माफी मागणे ही त्यांची मजबुरी आहे. त्यांनी माफी मागितली नसती तर जनतेने त्यांना जोड्याने मारले असते, माफी मागितली म्हणजे त्यांनी काही उपकार केलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि स्मारक बनवताना, ज्याप्रकारे भ्रष्टाचार झाला, त्याविरोधात जनता आवाज उठवत आहे. जनतेना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या. जनतेला भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यांना अडचण काय आहे. आम्ही भावना व्यक्त केल्या तर ते गोळ्या घालणार आहेत का, असा खरमरीत सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्रात बंदला न्यायालयाकडून परवानगी नाकारण्यात आली. मात्र, पश्चिम बंगालमध्ये बंद करण्यात आला. भाजपने केलेल्या बंदला परवानगी देण्यात आली का, राज्यात मोदींच्या चमच्यांचे राज्य आहे, त्यामुळे आम्हाला परवानगी नाकारण्यात आली का, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आणि न्याय दिसतनाही. न्यायाचा तराजून एका बाजूला झुकलेला दिसत आहे. याआधी अनेक नेत्यांनी पंडित नेहरू, मोराराजी देसाई यांनीही महाराष्ट्राची माफी मागितली होती. आता निवडणुका असल्याने मोदी यांनी माफी मागितली आहे. आता महाराष्ट्रासमोर त्यांना नाक घासावेच लागणार आहे. मालवणमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला नाही का, तिथे जो काही गोंधळ घालण्यात आला, तिथे गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही. एवढा खुचळट आणि बुळचट गृहमंत्री महाराष्ट्राने अद्यापपर्यंत पाहिला नाही. शिल्पकार कुठे आहे, ते वर्षा बंगल्यावर माहिती आहे, त्याला योग्यवेळी हजर केले जाईल, तसेच लवकर जामीन मिळेल, याबाबतचे आदेश ठाण्यातून देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानप्रकरणी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहे. फक्त आम्ही कायदा आणि जनतेने भान राखतो. देशात आणि राज्यात काँग्रेसचे राज्य असताना आम्हाला त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची परवानगी मिळाली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. छत्रपती शिवजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुलना करणेच अयोग्य आहे. यातही ते राजकारण करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अद्यापही भारतरत्न का देण्यात आला नाही, असा परखड सवालही त्यांनी केला. ते टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलत होते.