राज्यातील खोकेबाज, धोकेबाज सरकार घालवून महाविकास आघाडीचे सरकार येणार; नाना पटोले यांचा विश्वास

गोरगरिबांच्या तोंडाचा घास हिसकावणारे निर्ढावलेले महायुती सरकार घालवून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरी पांढरी रेष आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या तयाराची आढावा बैठक आणि मराठवाड्यातीव खासदारांच्या सत्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे झाला, त्यावेळी पटोले बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, त्यामागे जनतेची भक्कम साथ आहे. 2019 ला राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता, पण 2024 मध्ये 14 खासदार झाले. लोकसभेला विजय मिळाला तशीच कामगिरी विधानसभेलाही करायची आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी 2000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली ती केवळ निवडणुका डोळ्यासमोर केली आहे. याच संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ते मोदी-शाह यांचे हस्तक आहेत’ असे म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा मुख्यमंत्री गुजरातचा हस्तक कसा असू शकतो? महायुती सरकार हे खोकेबाजच नाहीतर धोकेबाजही आहे, या लबाडांचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी धनगर, मराठा, आदिवासी समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले पण 10 वर्ष सत्ता असतानाही आरक्षण मात्र दिले नाही. भाजप व फडणवीस यांनी जाती जातीमध्ये भांडणे लावली आहेत, त्यात जनतेने पडू नये मल्लिकार्जून खरगे व राहुल गांधी तुम्हाला न्याय देतील. गोरगरिबांच्या तोंडाचा घास हिसकावणारे निर्ढावलेले महायुती सरकार घालवून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरी पांढरी रेष आहे, असे नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकशाही व राज्यघटनेवर आघात होत असताना देशातील सर्वसामान्य माणूस काँग्रेस इंडिया आघाडीच्या पाठीशी उभा राहिला याची इतिहासात नोंद होईल. भारतीय जनता पक्षाला अहंकार झाला होता तो अहंकार जनतेने मोडून काढला आहे. आता विधानसभा निवडणुकीलाही इतिहास घडवायचा आहे. खोके देऊन आमदार फोडून बनवलेले हे खोके सरकार भ्रष्टाचाराने माखलेले आहे. या सरकारचा भ्रष्टाचार विधानसभेत मांडला पण सरकारने एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. भ्रष्ट मार्गाने पैसा कमावून निवडणुका लढवायचे काम महायुती करत आहे. या भ्रष्ट सरकारला घरी पाठवण्यासाठी विधानसभेला जास्तीत जागा निवडून आणा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महायुती सरकारवर तोफ डागली, ते म्हणाले की, भाजपाने लोकसभेला रामाच्या नावाने मते मागतिली पण जेथे जेथे प्रभूरामाचा पावन स्पर्श झाला त्या त्या जागी भाजपाचा पराभव झाला. महायुती सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे, 5 लाख कोटी रुपायांची टेंडर मंजूर करून त्यातून लुट केली आहे. एक एक उद्योग गुजरातला पळवून नेले, महिंद्राचा 25 हजार कोटी रुपयांचा उद्योग येणार होता तोही गुजरातला घेऊन गेले. महायुती सरकारने महाराष्ट्राच्या खूर्चीवर बसून राज्य गुजरातला गहाण टाकले आहे आता राज्याच्या स्वाभिमान परत आणण्यासाठी लढाई लढावी लागणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.