महाविकास आघाडीचा विस्तार झाला, अधिक मजबुतीने पुढे जाऊ; संजय राऊत यांचा विश्वास

महाविकास आघाडीची बैठक संपली आहे. ही बैठक सकारात्मक झाली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचा विस्तार झाला असून आम्हाला नवे मित्र पक्ष मिळाले आहेत, आता आम्ही अधिक मजबुतीने आणि ताकदीने पुढे जाऊ, असा विश्वास शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींसह मित्र पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी अधिक मजबूत झाल्याचे सांगितले. आज सकाळपासून आमची प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. आजची बैठक सकारात्मक झाली असून महाविकास आघाडीचा विस्तार झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची महाविकास आघाडी आहे, असा समज होता. मात्र, आता या आघाडीत सीपीआय, सीपीआय(एम), शेतकरी कामगार पक्ष, आप, समाजवादी पक्ष आणि जनता दल युनायटेडसह प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांना आम्ही महाविकास आघाडीत सहभागी करून घेतले आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

या सर्व घटक पक्षांशी आणि प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणखी ताकदीने वाटचाल करत आहे. तसेच समविचारी आणि नवे मित्र पक्ष आम्हाला मिळाले आहेत. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतचे पत्र हवे होते, ते त्यांना देण्यात आले आहे. आता 2 तारखेला होणाऱ्या बैठकीत प्रकाश आंबेडकर स्वतः सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेत नाहीत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. जागावाटपाबाबत सकारात्मकतेने चर्चा सुरू आहे, असेही राऊत यांनी सांगितले.