कोण कुठे लढणार जवळपास निश्चित, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; महाविकास आघाडीची आज निर्णायक बैठक

महाविकास आघाडीची महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. 48 जागांपैकी कोणती जागा कुणी लढवायची हे आजच्या बैठकीत जवळपास निश्चित झाले आहे. प्रत्येक जागा जिंकण्याच्या ईर्षेने लढवायची असा निर्धार करण्यात आला असून उद्या आमची निर्णायक बैठक होईल, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर दिली.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंबंधी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. 48 जागांवर कोणी कुठे लढायचं यावर आमचं सगळ्यांचं एकमत आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक जागा जिंकायची हे सूत्र ठरलेलं आहे, असे नमूद करतानाच जागावाटपावर उद्याची बैठक शेवटची असेल. त्यानंतर जागावाटपासाठी पुन्हा बैठक होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

वंचितचे प्रतिनिधी आज बैठकीला हजर होते. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही सातत्याने संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे. उद्या पुन्हा आम्ही चर्चेसाठी बसणार आहोत. उद्यानंतर जागाकाटपाकर कोणतीही बैठक पुन्हा होणार नाही. वंचितचे प्रतिनिधी आज चांगला आकडा घेऊन समाधानाने गेले आहेत. आता त्यांच्या कार्यकारिणीत प्रस्तावावर चर्चा होईल आणि उद्या पुन्हा सुहास्यवदनाने ते आमच्या बैठकीत सहभागी होतील. उद्या संध्याकाळपर्यंत फैसला होईल, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
बैठकीला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

लोकांचा महाविकास आघाडीवर विश्वास
राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरुण बेरोजगार आहेत. लोकांचा विद्यमान सरकारवर विश्वास राहिलेला नाही. महाविकास आघाडीवर लोकांचा विश्वास आहे. तसा सर्व्हेचा अहवाल आल्याचे पटोले यांनी याकेळी सांगितले.

जागावाटप उद्या घोषित होणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रमुख नेते असे सगळे मिळून नंतर जागावाटपाचा मसुदा जाहीर करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.