महाविकास आघाडी मजबूत आणि एकसंध, महाराष्ट्रातील सर्व 48 जागा जिंकणार

महाविकास आघाडी मजबूत आणि एकसंध आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा कुणाचीही असो, शिवसेनेची असो, राष्ट्रवादीची असो वा काँग्रेसची, प्रत्येक जागा आपलीच आहे अशा पद्धतीने सर्व 48 जागा जिंकण्याचा ठाम निर्धार आज करण्यात आला. आघाडीची पुढची बैठक 30 जानेवारीला होणार असून त्यात आणखी काही पक्षांना आघाडीत समाविष्ट करण्याबरोबरच निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. अशी माहिती बैठकीनंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी 6 वाजता संपली. बैठकीनंतर आघाडीच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले की, लोकसभेच्या 48 जागांवर बैठकीत चर्चा झाली आणि जागावाटप सुखरूप पार पडले. देव पाण्यात घालून बसलेल्या लोकांना आमचा संदेश आहे की आघाडीत सर्वकाही सुरळीत आणि सुरक्षितपणे सुरू असून येत्या 30 तारखेला पुन्हा बैठक होणार असून त्यात जागांवर निश्चिती होईल, असेही संजय राऊत म्हणाले. जागा वाटपाच्या फॉर्मुल्यावर जाऊ नका. प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची आहे असे आम्ही मानतो आणि 48 जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे, असे संजय राऊत यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांची यासंदर्भात आघाडीतील सर्व नेत्यांशी चर्चा झाली आहे. दिल्लीतल्या नेत्यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. ते समाधानी आहेत. वंचित बहुजन आघाडी हा आघाडीचा महत्वाचा घटक पक्ष आहे आणि राहील. भविष्यातही आम्ही आंबेडकर यांच्याबरोबर काम करू. देशातील लोकशाही व संविधान वाचवायला हवे, मोदींची हुकूमशाही व एकाधिकारशाही रोखायला हवी असे आमचे आणि आंबेडकर यांचेही मत आहे. असे संजय राऊत म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

या बैठकीला शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत, कॉंग्रेसच्या वतीने नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, प्रा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यासह सीपीआय, सीपीएम नेते उपस्थित होते.

काँग्रेसकडून अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात चर्चा करणार

प्रकाश आंबेडकर यांचा जो गैरसमज होता तो चर्चेनंतर दूर झाला असून त्यांचे समाधान झाले आहे, 30 तारखेच्या बैठकीला ते आमच्यासोबत असतील, असे यावेळी पटोले म्हणाले. काँग्रेसकडून राज्यातील जागावाटपाबाबत अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना चर्चा करण्याचे अधिकार देण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांना पुढच्या बैठकीचे निमंत्रण

डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत निर्णय झाला का असे यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारले. त्यावर वंचित बहुजन आघाडीशी सुसंवाद सुरू असून प्रकाश आंबेडकर यांना 30 जानेवारीच्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.