योजना देण्यापेक्षा कांद्याला भाव द्या, आम्ही आमदार, मंत्र्यांना फुकट कांदा देऊ; बच्चू कडू यांची महायुती सरकारवर टीका

राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत आहे. असे असताना शेतमालाला हमीभाव मिळत नाही. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन जास्त किंवा कमी झाले तरी समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तुम्ही आम्हाला योजना काय देतात. योजना जाहीर करण्याऐवजी आमच्या कांद्याला भाव द्या, अशी मागणी करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

लाडका भाऊ, लाडकी बहीण अशा योजना देण्याऐवजी आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला 4 क्विंटल कांदा, मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, असा टोलाही कडू यांनी लगावला. केंद्राच्या निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णयाचावरही त्यांनी कडाडून टीका केली. बच्चू कडू नाशिक दौऱ्यावर होते. देवळ्याच्या उमराणा येथील सभेत बच्चू कडू यांनी महायुती सरकारला झोडून काढले.

आमच्याकडे कांदा असल्यावर हस्तक्षेप करत नाही. शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही खासदार, आमदार बोलत नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा पक्ष प्रिय असतो. आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखविणार, तुम्ही आम्हाला रडवलं आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत. सरकारची लुटणारी व्यवस्था उखडून फेकणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.

नाफेडच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कडू यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी नाफेडच्या गोडावूनवर जात पाहणी केली. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी कांदा खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि यात लक्ष घालावे, अन्यथा तुमच्या गाडीवर कांदा फेकत थोबाड लाल करण्याचे आंदोलन करू, असा इशाराही कडू यांनी दिला.