विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

गणपती बाप्पासह पावसाचेही आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. आता पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच विदर्भातील पाच जिल्ह्यांना ऑरेंड अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी भात पीक आणि इतर पिके जमीनदोस्त झाली आहेत. जोरदार पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला बसला आहे. आगामी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. गोंदियातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भामरागड येथे पुरस्थिती निर्माण झाली आहे. छत्तीसगडमध्ये होत असलेल्या जोरदार पावसाने पार्लकोटा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचा फटका भामरागड शहराला बसला आहे.सिरोंचा तालुक्यातील इंद्रावती नदी काठेवर असलेल्या करजेली गावाला देखली पुराचा फटका बसला आहे. भंडारा शहरासह ग्रामीण भागाच्याही अनेक भागात जलमय स्थिती निर्माण झाली आहे.