ब्रेकनंतर पुन्हा मुसळधार सुरू होणार; कोकण, मराठवाड्याला अलर्ट

राज्यात सुमारे आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर आता सोमवारपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात सोमवारपासून अनेक ठिकाणी पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. अंदमानमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा राज्याच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. तर काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने 23 सप्टेंबरला कोकणातील काही भागात मध्यम व तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच 24 तारखेला नागपूरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येत्या आठवड्याभरात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र घाट भागात, कोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्या आले आहे.

सोमवारपासून नाशिकमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात 26 ते 30 ऑक्टोंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. अंदमान बेटाच्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. मराठवाड्यात अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. नांदेडमध्ये पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याकडून पुढाल दोन दिवस नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी दिला आहे. परभणीत पावसाला सुरुवात झाली आहे.