नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातल्या कुकडी साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे कोट्यवधी रुपये थकवल्याने कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. साखर आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आल्याने नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांच्या गाळप ऊसाचे पैसे थकवल्याने श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याकडून (कुकडी) 21 कोटी 3 लाख 50 हजार रुपयांच्या वसुलीसाठी साखर आयुक्तांनी कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांना देय रक्कम अदा करण्याचे आदेश (RRC) दिले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
सर्वाधिक थकबाकी असलेल्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कारखान्याच्या ‘आरआरसी’चा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालकांनी आयुक्तांकडे पाठवला होता. त्यावेळी ही थकबाकी 21 कोटी रुपयांवर गेली होती. त्यावर आयुक्तांकडे सुनावणी झाली. कारखान्याला म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर कारखान्याने शेतकऱ्यांची काही रक्कम अदा केली.
सध्या 15 कोटी 63 लाख 46 हजार रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय त्यावर 15 टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यामुळे ही रक्कम कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊन त्यावर शासनाचे नाव लावून, कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून, साखर, मोलॅसिस व इतर उत्पादने जप्त व विक्री करून त्यामधून ही रक्कम वसूल करावी, असा आदेश साखर आयुक्तांनी दिला आहे.