आता कैद्यांना तुरुंगात मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम, कारागृह विभागाचा मोठा निर्णय

आतापर्यंत तुम्ही तुरुंगातील कैद्यांना भात आणि डाळ खाताना चित्रपटांमध्ये पाहिले असेल आणि कैद्यांना नंबर असलेल्या कपड्यांमध्ये बघितले असेल. मात्र आता महाराष्ट्र कारागृह विभागाने अलीकडेच कारागृहातील कॅन्टीनमधून कैदी पदार्थ खरेदी करू शकतील असा निर्णय घेतला आहे. कैद्यांना जीवनावश्यक आणि मनोरंजनाच्या वस्तू मिळण्यासाठी कॅन्टीन कॅटलॉगमध्ये एकूण 173 वस्तूंची यादी करण्यात आली आहे. यात आरोपींना जेवण आणि नाश्त्याचा मेन्यू दिला जाणार आहे. मात्र, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मोफत मिळणार नाहीत, ते पैसे देऊन विकत घ्यावे लागतील असे सांगितले आहे.

यात चाट मसाला, लोणचे, ताजे पाणी, चेस बोर्ड, ओट्स, कॉफी पावडर, लोणावळा चिक्की, शुगर फ्री स्वीटनर, आईस्क्रीम, सेंद्रिय फळे, पीनट बटर, पाणीपुरी, आर्ट बुक्स, कलरिंग मटेरियल या वस्तूंची यादी करण्यात आली आहे. याशिवाय, फेस वॉश, केसांचा रंग इत्यादी वैयक्तिक काळजीच्या वस्तूंचाही समावेश आहे. धूम्रपान करण्याची इच्छा कमी करण्यासाठी निकोटीन-आधारित गोळ्यांना देखील परवानगी आहे. हा निर्णय कैद्यांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता म्हणाले की, निर्बंधांमुळे कैद्यांची मानसिक संतुलन बिघडू शकते. तसेच कैद्यांचे मानसिक आरोग्य राखणे हा त्यांना सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. कैद्यांना विविध अन्न पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडावा यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे.