शरद पवार यांनी केले उद्धव ठाकरे यांचे कौतुक; वाचा काय म्हणाले…

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू आहे. जागावाटपाच्या चर्चेवेळी मुख्यमंत्रि‍पदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या काळातील कामाचे कौतुक केले आहे. तसेच आता महाविकास आघाडीसमोर मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा नसून जास्तीतजास्त जागा मिळवणे हेच आमचे उद्दीष्ट्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिदाच्या कार्यकाळाचे कोतूक करताना शरद पवार म्हणाले की, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज होती. केंद्राच्या धोरणांना राज्यात सहकार्य करत हे संकट परतवण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांनी केंद्र सरकारचे धोरण, त्यांचा पक्ष किंवा कोणताही राजकीय विचार न करता या संकंटाला तोंड दिले. कोरोनामुळे अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात मृत्युच्या घटना घडल्या. ती स्थिती महाराष्ट्रात होणार नाही, कोरोनाच्या फैलावापासून जनतेला वाचवण्यासाठी राज्याची प्रशासकीय यंत्रणा त्यांनी कामाला लावली. त्या संकंटाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी जे धैर्य आणि जे प्रशासन दाखवले, त्याचे स्वागतच केले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार म्हणाले की, कोण मुख्यमंत्री होईल, हा विषयच आता आमच्या पुढे नाही. पण, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाचे संकट होते. संबंध देशात, जगावर हे संकंट होते. केंद्र सरकारने अनेक गोष्टींवर बंधने घातली होती. त्या कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रकारे काम केले ते कौतुकास्पद आहे, असेही शरद पवार म्हणाले.