फक्त राज्यसभा सदस्यत्व ही त्यांची लायकी नाही, ते खूप मोठे होते; भाजप नेत्याचा अशोक चव्हाणांना टोला

नांदेडमधील लोकसभेची जागा खिशात टाकण्यासाठी भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर दबाव टाकून त्यांना भाजपमध्ये घेत राज्यसभा सदस्यत्व दिले. फक्त राज्यसभा सदस्यत्व ही अशोक चव्हाण यांची लागकी नाही, ते खूप मोठे होते. भाजपमध्ये गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असा टोला भाजपाच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अशोक चव्हाण यांना लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात आले भाजपला समाधान झाले असेल, पण अशोक चव्हाण यांचे मात्र भाजपात येऊन खूप मोठे नुकसान झाले आहे. एक राज्यसभा ही अशोक चव्हाण यांची लायकी नाही, अशोक चव्हाण यापेक्षा खूप मोठे आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांचे भाजपत आल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे, असे सूर्यकांता पाटील म्हणाल्या.

नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने हा पराभव खासदार अशोक चव्हाण यांच्यामुळे झाला अशी चर्चा सुरू आहे. कुठल्याही पराभवाचे खापर एका नेत्यावर फोडून चालणार नाही. अशोक चव्हाणांमुळे भाजपचा नांदेड जिल्ह्यात पराभव झाला असे कोणीही म्हणू शकत नाही, असेही सुर्यकांता पाटील म्हणाल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि अशोक चव्हाणांनी ऐन निवडणुकीत बदलेला पक्ष या सर्व बाबींमुळे नांदेड मतदारसंघात नाराजी पसरली होती. त्यामुळे प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण एकत्र असूनही नांदेडमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सर्व घडामोडींमुळे अशओक चव्हाण अडचणीत आल्याचे दिसत आहे. तसेच भाजप नेत्या सूर्यकांता पाटील यांनीही चव्हाणांना टोला लगावला आहे.