जनतेनेच ‘करेक्ट कार्यक्रम’ केला; दमदाटी करणाऱ्यांचा शरद पवारांनी घेतला समाचार

ajit-pawar-sharad-pawar

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता बारामतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात जात तेथील ग्रामस्थांशी शरद पवार यांनी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दमदाटी करणाऱ्यांचा त्यांनी नाव न घेता चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत येथील जनता आपल्या पाठिशी राहिली. गेल्या 57 वर्षांपासून आपण सर्वजण माझ्या पाठिशी आहात, असे ते म्हणाले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केलं.

गेले काही वर्ष या भागाचे प्रश्न असतील ते दुसऱ्यावर टाकले होते आणि मी राज्य आणि देश पातळीवर काम करण्यासाठी वेळ घालवला. आपली पहिली निवडणूक सोपी नव्हती,कष्ट घ्यावे लागले. त्यानंतर हा भाग तुम्ही सांभाळला, मी राज्यात फिरत होतो. नंतर तीन वेळेला लोकसभेला सुप्रिया सुळे यांना तुम्ही निवडून दिले, तर देशाच्या लोकशाहीत मलाही निवडून दिले. यंदाची लोकसभा निवडणूक सोपी नव्हती,देशात आणि जगभरात या मतदारसंघाची चर्चा होती. काही लोकांना फोन येऊ लागले, प्रेमाने, दमदाटीही केली, जे याआधी घडले नव्हते ते या निवडणुकीत पहिला मिळाले. तरीही जनतेला काही सांगावे लागले नाही. जनतेने तुतारी दिल्लीला पाठवली. बारामतीकरांनी न बोलता करेक्ट कार्यक्रम केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

आता, साहजिकच लोकांच्या कामासाठी आम्हाला अधिक लक्ष घालावं लागेल. आज मोदींची सत्ता आहे, आपली सत्ता नाही, एक वेगळा विचार दाखवायला सुरुवात केली. मोदी समोर कोणी टिकणार नाही, अशी हवा तयार केली. मोदींनी राज्यभर 16 सभा घेतल्या, प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेतलं हे माझे भाग्य समजतो. लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 जागा लढलो आणि 31 जिंकलो, राष्ट्रवादीचे 10 पैकी 8 ठिकाणचे उमेदवार विक्रमी मतांनी जिंकून दिले. पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, इतर कोणीही असो, दमदाटी करणाऱ्याची नोंद मतदारांनी घेतली नाही, त्यांनी आपलं मतदान योग्य ठिकाणी केले, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. आज अनेक प्रश्न आहेत,ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी ते सोडवले नाहीत. सत्तेचा गैरवापर करणाऱ्याना त्यांची जागा दाखवावी लागेल. आपल्याला सत्ता बदलावी लागेल, सत्ता हातात घेतली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.