नाती ही मनापासून निर्माण होतात, पैशाने नाही; सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावले

महायुती सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. त्यावर अनेकांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नात्यांबाबत महत्त्वाचे वक्तव्य करत महायुतीच्या नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. नाती ही फक्त 1500 रुपयांनी जोडली जात नाहीत. ती मनाने जोडली जातात. मला विचारालं तर तो नात्यांचा अपमान आहे. पैशांच्या नात्यांना व्यवहार म्हणतात. नात्यांमध्ये प्रेम असतं,व्यवहार नसतो. ज्यांना नातीच कळाली नाहीत, त्यांच्याकडुन काय अपेक्षा करणार, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी योजनेवरुन महायुती सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आयोजित शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सराटी (ता. इंदापूर) येथे आयोजित सभेत त्यांनी नात्यांबाबत व्यक्तव्य केले. नाती ही मनापासून निर्माण होतात. पैशाने नाही, त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आपली सत्ता वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण स्वाभिमानी मायबाप जनता त्यांना आपली ताकद आगामी विधानसभा निवडणूकीत नक्की दाखवेल, असा विश्वास व्यक्त केला. सुरुवातीला मला संघर्ष माहित नव्हता, पण नंतर पक्ष चिन्ह हातातून गेल्यामुळे संघर्ष करावा लागला, पण जनतेच्या आशीर्वादामुळे आपण जिंकू शकलो, असे सांगून मायबाप जनतेचे आभार मानले. यावेळी शासनाच्या अनागोंदी कारभारावर टिका केली. तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एसटीचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाईल,असे आश्वासन दिले. हे सरकार फक्त मोठ्या कंत्राटदारांचे हित जोपासत असून अंगणवाडी भगिनी, आशा भगिनी, युवक, महिला शेतकरी यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत या राज्यात हवा बदलणार असून महाविकास आघाडीचे सरकार येईल,असा विश्वास व्यक्त केला. आपले सरकार आल्यानंतर शेतकरी, युवक, महिला सुरक्षा या गोष्टींन प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. आगामी काळात आदरणीय पवार साहेबांचे विचार आणि आपले चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे असे आवाहन केले. शिवस्वराज्य यात्रेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले.

भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी आपल्याला सरकार बदलायचे आहे, त्यामुळे सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहन सुळे यांनी केले. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जनता आपली एकजूट दाखवेल आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.