पुण्यातील बंडोबांना थंड करण्यासाठी धावाधाव

neta-leader

विधानसभा निवडणुकीतील बंडोबांना थंड करण्यासाठी भर दिवाळीतही नेत्यांना त्यांची मनधरणी करावी लागत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवडमधील एका बंडखोराच्या घरी जाऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, तर अनेक ठिकाणी घावाधाव करून नेते मंडळींनी त्यांचे दूत पाठवून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज पहिल्या दिवशी माघारीसाठी उमेदवारांचा प्रतिसाद नव्हता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मात्र, त्यापूर्वीच बंडखोरांना थंड करून त्यांच्या माघारीची घोषणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे 13 विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी अधिकृत उमेदवार त्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अनेक उमेदवार अडचणीत आले असून, जिल्ह्यातील महायुतीचे नेते टेन्शनमध्ये आले आहेत.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील तीन स्थानिक नेत्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हीच परिस्थिती भोर तालुक्यात असून, दौंड आणि पुरंदरमध्ये तर महायुतीमध्ये फूट पडली आहे. दौंडमध्ये भाजपचे उमेदवार आणि पुरंदरमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवार उभे करण्यात आल्याने महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. आज महायुतीमधील स्थानिक उमेदवारांकडून अजित पवार गटाच्या विरोधात धुसफूस सुरू झाली. शहरात पर्वती, खडकवासला, हडपसर, कसबा पेठ मतदारसंघांतील बंडखोरांना थांबविण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी प्रयत्न सुरू केले. वरिष्ठ नेत्यांशी फोनवर बोलणी करून दिली जात आहे.

अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार हा एकच दिवस
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस होता. आता दिवाळीमुळे सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर हा शेवटचा एकच दिवस ठरला आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी आणि राजकीय उलाढाल्या होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांचा गाठीभेटींवर भर
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनीदेखील प्रचार फेऱ्या किंवा रॅली काढण्याऐवजी सध्या दिवाळी शुभेच्छांच्या निमित्ताने व्यक्तिगत गाठीभेटींवर भर दिला आहे. त्याचबरोबर संपूर्ण प्रचाराची पूर्वतयारी करण्यासाठी यंत्रणा उभी करणे, त्यासाठीच्या परवानगी घेणे, प्रचारपत्रके तसेच सोशल मीडियावर उमेदवार आणि राजकीय पक्षांनी भर दिला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वयाच्या बैठकांवरदेखील जोर दिला आहे.