बारामतीसह पुण्यात अजित पवार गटाला शरद पवारांचा पक्ष टक्कर देणार; बंडखोरांमुळे महायुतीच्या अडचणीत वाढ

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राज्यात सगळ्याचे लक्ष असलेल्या बारामती मददारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी रंगतदार लढत होत आहे. तर पुणे जिल्ह्यातही अजित पवार गट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांपैकी अनेक टिकाणी बंडखोरी झाली आहे. या बंडखोरीमुळे महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राज्यात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. तरीही बहुतेक बारामती, वडगाव शेरी, हडपसर, आंबेगाव, जुन्नर, पिंपरी, इंदापूर, शिरूर या पुणे जिल्ह्यातील मतदारसंघांत प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध अजित पवार गट यांच्यात होणार आहे. त्यामुळे येथील लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवार महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील युगेंद्र पवार यांच्याशी होत आहे. काका- पुतण्याच्या या लढतीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी अखेरची मुदत असल्याने महायुतीच्या नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी करण्यात येत होती. मात्र, तरीही अनेक ठिकाणी बंडखोरी कायम राहिली. पुण्यात जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. त्यात प्रामुख्याने पुणे शहरात कसबा, शिवाजीनगर, पर्वती, तर जिल्ह्यात जुन्नर, इंदापूर, पुरंदर, भोर या मतदारसंघांचा समावेश आहे. या ठिकाणच्या बंडखोरींमुळे महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे.