जनताच आता राज्यात कायद्याचे राज्य निर्माण करत कौरवी वृत्तींचा नायनाट करेल; रोहित पवार यांचा विश्वास

राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. अनेक जिल्ह्यात खुलेआम गुंडागर्दी करण्यात येत आहे. राज्यात महिलाही सुरक्षित नाहीत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटप होत असल्याचे दिसत आहे. तसेच कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या सर्वांना राज्याचे आकार्यक्षम गृहमंत्री जबाबदार आहे, असे सांगत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

राज्यातील परिस्थितीबाबत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत महायुतीवर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता केवळ पैसेच नाही तर बंधुका शस्त्रसाठा सुद्धा वापरला जात आहे. हे कोणामुळे शक्य झाले असेल तर ते राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अकार्यक्षम गृहमंत्र्यांमुळे!

स्वतःला अभिमन्यू म्हणवून घेणारे गृहमंत्री प्रत्यक्षात धुतराष्ट्र असून त्यांनी दुर्योधनरुपी गुंडागर्दीला नेहमीच प्रोत्साहन दिले. असो जनता आता राज्यात कायद्याचे राज्य निर्माण करणारे सरकार स्थापन करून अशा कौरवी वृत्तींचा नायनाट करेल हा विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.