जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता,एकत्रच निवडणूक लढवणार; शरद पवार यांची भूमिका

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतल तीन पक्ष महत्त्वाचे पक्ष मित्रपक्षांसह एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे जागावाटपाबाबत महायुतीत एकावाक्यता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. एका जागावेर तीन पक्षांपैकी एका पक्षाचाच उमेदवार दिला जाईल, त्याला इतर पक्ष पाठिंबा देतील, यावरही महाविकास आघाडीत एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमच्या पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरू आहे. जागांचा अभ्यास. जनतेचा कौल आणि इतर बाबींचाही विचार करण्यात येत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील गट याबाबतचा अभ्यास करत आहे. आता महाविकास आघाडीतील प्रमुख नेते जागावाटपाबाबत चर्चा करत आहेत. जागावाटप झाल्यानंतर संबंधित पक्ष त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेणार आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत हे सर्व कामे संपवून प्रत्यक्ष जनतेत जात त्यांच्याशी संवाद साधत आमची भूमिका जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी आशादायक वातावरण आहे. जनतेचा कौल महाविकास आघाडीकडे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेला परिवर्तन हवे आहे, हे जनतेने दाखवून दिले आहे. सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेतून हटवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. आता जनता फक्त निवडणुकीची वाट बघत आहे. त्यामुळे राज्यात सत्तापरिवर्तन निश्चितच होणार आहे, असेही शरद पवार म्हणाले. वन नेशन वन इलेक्शनबाबत इंडिया आघाडी एकत्र बैठक घेत भूमिका ठरवणार आहे. आमच्या सहकारी पक्षांची मते आणि भूमिका जाणून घेतल्याशिवाय त्यावर मत व्यक्त करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.