येत्या निवडणुकीत 9 मंत्र्यांना पाडणार, त्यांची नावे लवकरच सांगणार; जरांगे पाटील यांचा इशारा

मराठ्यांच्या सापडलेल्या कुणबी नोंदी रद्द करा, असे काही नेते म्हणत आहेत. यावरून हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे की नाही हे समजते. शेकडो वर्षाच्या नोंदी रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्यांनीच 70 वर्षे बोगस आरक्षण घेतल्याचा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच त्यांनी यावेळी सरकारला इशाराही दिला. या निवडणुकीत 9 मंत्र्यांना पाडणार असून 13 जुलैला त्यांची नावे जाहीर करणार असल्याचेही जरांगे म्हणाले.

आपण येत्या निवडणुकीमध्ये 9 मंत्र्यांना पाडणार आहोत. आपण 13 तारखेला त्यांची नावे सांगणार आहोत, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. ओबीसी नेते एकत्र आले. मात्र, नोंदी रद्द करा, अशी मागणी आम्हाला चालणार नाही. कुणबी मराठे एकच आहेत ते लक्षात घ्या. आता काहीही झाले तरी मागे हटू नका. नोंदी रद्द करण्याची मागणी सहन केली जाणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

मी माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. मात्र, तुम्ही ओबीसी दबावाला बळी पडून आमच्यावर अन्याय करणार असे दिसते. तुम्ही त्यांना सरकारकडून फूस लावता आणि आंदोलन तुम्हीच उभे करता. मी तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.