….या सर्व तर आमच्या योजना, तुम्ही स्वत:चे काय आणले; वर्षा गायकवाड यांचा मिंधे सरकारला सवाल

राज्य सरकारने अर्थसंकल्पात योजनांचा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना स्वतःलाच माहिती नाही की या योजना पुढे कशा न्यायच्या आहेत ते, असा टोला काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मिंधे सरकारला लागवला. दोन अडीच वर्षापासून तुमचे सरकार आहे. मात्र, निवडणुकीच्या तीन महिने आधी तुम्ही ही योजना जाहीर केली. तुम्ही केलेले काम काय तुम्हाला लोक विसरले असतील असे वाटले का, म्हणून पुन्हा त्याच योजना जाहीर करत आहात, असा सवाल करत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

माझा प्रश्न आहे की लेक लाडकी योजनेचे काय झाले? आम्ही सुकन्या सुरू केली, त्याचे नाव बदलून लेक भाग्यश्री आणली. भाग्यश्रीला बदलून लेक लाडकी योजना आणली होती. याचे किती लाभार्थी झाले याची संख्या सरकारने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली. महिलांविषयी तुमचे काय धोरण आहे ते आम्हाला माहिती आहे. महिलेला मंत्री करायला तुमचे धोरण नव्हते. भाजपने एकही महिलेला मंत्री केलेले नाही. त्यामुळे तुमचे महिलांबद्दल धोरण काय आहे ते मला सांगायची आवश्यकता नाही. आता जाहीर केलेल्या या सर्व आमच्या योजना आहेत. तुम्ही स्वत:चे काय आणले, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.

मुंबईतील अनेक जमिनी हडपण्याचा डाव सुरू आहे. आमची मागणी आहे की धारावीकरांना धारावीतच घर मिळावे. मग हे सर्वे, जमीन तुम्हाला कशाला हवी आहे. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी त्यांच्या मित्रांना देण्याचे काम सुरू आहे का? जो जमीन सरकार की वो अदानी की असे सध्या मुंबईत सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी संसदेत आवाज उठविणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.