विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिह्यात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. जिह्यातील 11 मतदारसंघांत अधिकृत व अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर सोमवारी माघारीच्या अंतिम दिवशी लढतींचे खरे चित्र स्पष्ट झाले. काही मतदारसंघांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्षाचे राज्यभरात ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांना अखेर स्वतŠच्याच जळगाव जिह्यात मोठय़ा नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. बंडखोर कार्यकर्त्यांनी अखेर माघार न घेता रिंगणात कायम राहिल्याने ‘संकटमोचकां’ची मनधरणी अखेर निष्फळ ठरली आहे. भाजपच्या बंडखोर कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी महायुतीच्याच उमेदवारांविरुद्ध दाखल केली आहे.
बंडखोरांनी मनधरणी फेटाळली
जिह्यात जळगाव शहर, एरंडोल, पारोळा, पाचोरा, अमळनेर अशा महत्त्वाच्या ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे. काहींना फोनवर संपर्क केले, काहींना प्रत्यक्ष बोलावले होते. मनधरणी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी तीन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मात्र माघारीच्या अखेरच्या दिवशी संकटमोचक परीक्षेत नापास झाले असून बंडखोर कार्यकर्ते रिंगणात कायम राहिले आहे. यात प्रमुख बंडखोरांमध्ये जळगावात अश्विन सोनवणे, मयूर कापसे, पारोळा-एरंडोल येथे माजी खासदार ए. टी. पाटील, पाचोरा येथे अमोल शिंदे, अमळनेर येथे भाजप समर्थक शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.