पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी माणचूर येथील महादेवाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. मात्र त्यांची शुभारंभाची सभा गर्दीअभावी फ्लॉप झाली. सभेला दोन आजी-माजी आमदारांची उपस्थिती असूनही मतदारांनी शुभारंभाच्या सभेकडे पाठ फिरवली. महिलांची उपस्थिती तर अगदी नगण्य होती. ना सभेत जोश ना जल्लोष. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे.
प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे या दोन भाजपा नेत्यांमध्ये गेल्या काही काळापासून बिनसले आहे. तरीही ते दोघे व्यासपीठावर एकत्र आले. ते दोघे व्यासपीठावर जवळ बसले होते, तरी ते मनाने खूप दूर गेल्याचे त्यांच्या देहबोलीवरून जाणवत होते.
एबी फॉर्म घेऊन लाईन लागली…
प्रशांत परिचारक निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता समाधान आवताडे यांना दिली. त्यामुळे परिचारक नाराज असल्याचे समजते. पक्षश्रेष्ठींनी तंबी दिल्यानंतर परिचारक नाइलाजाने प्रचारात उतरल्याचे दिसून येतंय. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने मला थांबायला सांगितले. मी पक्ष बदलायचे ठरवले असते तर कुणीही मला उमेदवारी द्यायला तयार होते. माझ्या दारात एबी फॉर्म घेऊन अनेक पक्षांची लाईन लागली होती, असे हास्यास्पद विधान परिचारक यांनी केले.