विरोधी पक्षनेता कोण होणार यावर महायुतीने चर्चा करावी; बाळासाहेब थोरात यांचा जबरदस्त टोला

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून बैठका आणि चर्चा होत आहेत. अनेक ठिकाणी मतदारसंघांचा आढावाही घेण्यात येत आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी थोरात यांनी महायुतीच्या नेत्यांना जबरदस्त टोला लगावला. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून महायुतीच्या नेत्यांनी आता मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा विरोधी पक्ष नेता कोणा होणार यावर चर्चा करायला हवी, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. आम्ही ज्यावेळी चर्चेला बसतो त्यावेळी एक एक मतदारसंघाचं नाव पुढं येत असतं. त्या मतदारसंघावर आम्ही दावा करतो, काही वेळा मित्रपक्षांकडून दावा केला जातो, असं थोरात यांनी सांगितले. त्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घण्यात येतो. महाविकास आघाडीत 125 जागांवर कोणताही वाद नसल्याने त्याचा तिढा सुटला आहे. आता फक्त 30 जागेवर पेच आहे तर उर्वरित जागा चर्चेतून सुटण्याच्या मार्गावर आहे. आम्हाला मित्र पक्षांना देखील काही जागा सोडाव्या लागणार आहेत. येणाऱ्या दहा दिवसात मविआचं जागावाटपाचं सूत्र समोर येईल, असंही ते म्हणाले.

आपल्या देशातील स्थिती पाहिली असता वन नेशन आणि वन इलेक्शन अवघड असल्याचं थोरात यांनी सांगितले. एकाच वेळी एव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि मनुष्यबळ याचा विचार करता हे सर्व जुळवणे अवघड असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.