दिवा विझताना जास्त फडफडतो, तसे महायुती सरकारचे झाले आहे; जयंत पाटील यांचा हल्लाबोल

राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बुधवारी मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले. या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारला वेगळ्या 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडाव्या लागतात, यावरून सरकारमध्ये गोंधळ असल्याचे दिसत आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड असे विविध कामांसाठी ज्या ठिकाणी वीस रुपये खर्च अपेक्षित होता, अशा ठिकाणी शंभर रुपये खर्च केल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील म्हणाले, सरकार मुद्दाम सभागृह चालू देत नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनीच गोंधळ घातला आणि कामकाज बंद पाडलं. जर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचे होते तर मग कामकाज का बंद पाडले, असा सवालही जयंत पाटील यांनी केला. तसेच दिवा विझताना जास्त फडफडतो तशी सध्या महायुती सरकारची अवस्था आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

बादशाहाला वाटेल आणि बादशहाच्या मनात येईल त्यासारखे निर्णय घेतले जात आहेत. त्यासाठी अतोनात पैसा खर्च केला जात आहे. बादशाहाच्या मनात आले क्रिकेट खेळाडूंना पैसे दिले. त्यामुळे आता लोकसभेनंतर विधानसभेतही जनता या सर्वांचा पराभव जनता करणार आहे, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.