ते आता आमच्यापासून फार लांब गेलेत, आमच्याकडील सर्व जागा भरल्या आहेत; अजित पवार गटाबाबत जयंत पाटलांचे उत्तर

राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होत असून 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीनंतर राज्याचे राजकीय चित्र कसे असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. निवडणूक निकालानंतर अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याबाबत नवाब मलिक यांनी वक्तव्य करत अनेक दावे केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाल्या. अजित पवार यांना सोबत घेणार का, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. .

एकनाथ शिंदेंसोबत शरद पवार निवडणुकीनंतर आघाडी करू शकतात, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनासोबत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आता महायुती सरकारने सांगायचं की, देवेंद्र फडणवीस युतीचा चेहरा असणार की, एकनाथ शिंदे?, असा सवाल करत त्यांनी महायुतील टोला लगावला.

विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली तर त्यांना सोबत घेणार का, यावर जयंत पाचील म्हणाले की, अजित पवार आमच्यापासून फार लांब गेलेत. ते आमच्यापासून लांब गेल्याचं सगळ्या देशाला दिसतंय. ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली. त्यावरून ते बरेच लांब गेलेत. ते परत येण्याची शक्यता नाही. त्यामुळे ते परत आमच्याकडे येणार का, अशा प्रश्नच उद्भवत नाही. तसेही आमच्याकडे सगळ्या जागा आता भरल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.