ही लोकशाहीची निर्लज्ज हत्या, देशासाठी महत्त्वाचे संकेत; आदित्य ठाकरे कडाडले

विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाला मूळ राजकीय पक्ष ठरवणे ही लोकशाहीची निर्लज्ज हत्याच आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. देशासाठी हे मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये गद्दारी आणि राजकारण कायदेशीर झाले तर आपले संविधान बदलले जाईल. भाजपला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलायचे आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान भाजापला मान्य नाही हे स्पष्ट होत आहे. देशासाठी आगामी काळातील हे महत्त्वाचे संकेत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पक्षप्रमुखाला पदावरून काढण्याचा अधिकार नसतो, असे निरिक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवले आहे. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, जेवढी वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते तेव्हा ते कोणत्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते, एबी फॉर्म कोणाकडून घेत होते, दिवसाढवळ्या लोकशाहीची अशी हत्या गेल्या 75 वर्षात झालेली पाहिली नाही. विधानसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या उलटतपासणीला उद्धव ठाकरे गैरहजर राहिले, असाही उल्लेख नार्वेकर यांनी केला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, आता खोके सरकारची उलटतपासणी करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाकडून आता अपेक्षा आहेतच, पण त्याहीपेक्षा जास्त अपेक्षा जनतेकडून आहे.आम्ही आता जनतेच्या न्यायालयात आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

राज्यात जी सर्कस सुरु आहे ती थांबली पाहिजे. आम्ही न्याय शिवसेनेसाठी मागत नाही तर राज्यासाठी आणि देशासाठी मागत आहोत. महाराष्ट्र देखील देशातच आहे, देशाच्या बाहेर नाही. आमच्या राज्यावर अन्याय का केला जात आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.