परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा सहन करत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसेल असा अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात येत्या 24 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने जोर‘धार’ पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाडा, विदर्भातील काही जिह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातील काही जिह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर काही जिह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री ठाण्यासह नवी मुंबई, पालघर जिह्यात मुसळधार पाऊस पडला. ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते तसेच अधूनमधून एखादी सर येऊन जात होती.

– विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई आणि कोकणातही जोरदार पाऊस कोसळेल.

– पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशीव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

– रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

नगरला झोडपले

नगर शहरासह संपूर्ण जिह्याला गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाने अक्षरशŠ झोडपले. नगर शहराच्या बाजूने वाहत असलेल्या सीना नदीला पूर आला. सीना नदीला आलेल्या पाण्याने नगर-कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. नगर-कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. हवामान खात्याने तीन दिवस नगर जिह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.