‘ऑक्टोबर हिट’मध्ये पावसाचा खेळ चाले! मुंबई, ठाणे आणि कोकणात ‘यलो अलर्ट’ जारी

दरवर्षी साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस ते 15 ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रातून परततो. मात्र, यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातच रखडल्याने परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले. या परतीच्या पावसाचा फटका पिकांनाही बसला. काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असताना काही ठिकाणी ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत होते. मुंबईत आलेल्या पावसाच्या मध्यम सरींनी गारवा निर्माण झाला असून प्रदूषणाचे प्रमाणही कमी झाले आहे. आता आठवडाभर राज्यात पावसाचा असचा खेळ सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ऐन ऑक्टोबर महिन्यातही पावसाची रिमझिम सुरुच आहे. येत्या आठवड्यात मुंबई, ठाणे, कोकणासह राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शनिवारी संध्याकाळपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अनेक भागात रविवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, त्यानुसार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने राज्यातही त्याचा परिणाम दिसून येणार आहे.

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात रविवारी ‘यलो अलर्ट’ जारी करत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईसह कोकणात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुंबईसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी उशिरा मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच हा आठवडाभर पावसाचा अंदाज कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे आठवडाभरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदा दसरा उलटून गेल्यानंतरही थंडीची चाहूल लागलेली नाही. त्यातच आता हवामान खात्याने आठवड्याभरासाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अरबी समुद्र व बंगालच्या खाडीत बदललेल्या परिस्थितीमुळे विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र थंडीची चाहूल कधी जाणवेल, ही प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.