Maharashtra election 2024 – आता जनताच न्याय करेल… निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रीया

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र व झारखंडमधील विधानसभा निवडणूकांची घोषणा केली. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर या निवडणूकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे प्रतिक्रीया देताना मिंधे भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ”याच क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राला लुटणाऱ्या मिंधे भाजप सरकारला सत्तेतून हटविण्यासाठी आपल्याला बदल हवा आहे. आपण न्यायाची वाट पाहत होतो पण आता जनताच न्याय करेल, जय महाराष्ट्र’, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

 लढू, जिंकू आणि सरकार बनवू – संजय राऊत

लोकसभेपेक्षाही विधानसभेला महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चांगला असेल. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सरकार बदलणार आहे. मोदी, शहा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या समर्थनाने जे घटनाबाह्य सरकार बसवण्यात आले त्याला जनताच पायउतार करेल. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी असून आम्ही लोकसभेला एकजुटीने लढलो, तसेच विधानसभेलाही लढू. जो जिंकेल त्याची जागा असे सूत्र असून आम्ही लढू, जिंकू आणि सरकार बनवू, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.