धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करा, प्रजासत्ताक दिनी नाना पटोलेंचे आवाहन

देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ते आज स्पष्ट दिसत आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली, बलिदान द्यावे लागले. सत्तेत आज धर्मांध शक्ती आहेत आणि लोकशाही, संविधान, सर्व लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली जात आहे. स्वातंत्र, लोकशाही, संविधानाला न मानणाऱ्या विचारधारेच्या धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे नेते होते, त्यांनी जी भिती व्यक्त केली होती ती आज खरी ठरत आहे. देशात आज जाती-धर्माच्या नावाने भांडणे लावली जात आहेत. विविध भाषा, जाती, धर्म, संस्कृतीचे लोक या देशात गुण्यागोविंदाने रहात असताना देश तोडण्याचे काम केले जात आहे.

ओबीसी, आदिवासी, एससी, एसटी यांचे अधिकार कमी केले जात आहेत. गांधी-नेहरुंचा विचार संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत. पुण्यात महत्मा गांधी यांच्यावरील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पण ही स्पर्धा होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न केले. नवीन पिढीला महात्मा गांधी समजू नयेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा, नाना पटोले यांचा सरकारला इशारा

आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’ चा मंत्र दिला होता. कोणत्याही परिस्थितीत देशातून धर्मांध शक्तीचे सरकार खाली खेचणे गरजेचे आहे. राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्याचे काम करत आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान अबाधित ठेवण्याचा संकल्प आजच्या दिवशी करा, असे आवाहन करत नाना पटोले यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.