Maratha Reservation : ज्यांच्या नोंदी त्यांनाच प्रमाणपत्र, गिरीश महाजनांनी मराठा आरक्षणाबाबत केलं वक्तव्य

मराठा आरक्षणाबाबत भाजप नेते गिरीज महाजन यांनी मोठं वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर आता महाजन यांनी केलेल्या विधानामुळे सकल मराठा समाजात खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणावर बोलताना  गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत, ज्यांच्या नोंदी त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येणार, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील चर्चेत आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अल्टिमेटमही दिला आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गिरीश महाजन यांनी पुढे सांगितले की,  मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वत: जातीने लक्ष्य देत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी केलेली सरसकट प्रमाणपत्र मिळावे ही मागणी शक्य नाही. ज्यावेळी त्यांना भेटायला गेलो त्यावेळी या संदर्भात सांगितले आहे. आतापर्यंत जेवढ्या कुणबी नोंदी मिळल्या त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. मात्र मराठा समाजाला सरसकट आरक्षण कसे देता येणार? असा प्रश्नही महाजन यांनी उपस्थित केला. तसेच ज्यांच्या नोंदी त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गिरीश महाजन पुढे म्हणाले, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मागच्यावेळी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने फेरयाचिका दाखल केली आहे.