Maharashtra Assembly Session : हे अधिवेशन महायुती सरकारला बाय बाय करणारे, अंबादास दानवे यांचा घणाघात; विरोधी पक्षांचा चहापानावर बहिष्कार

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या सरकारच्या चहापान निमंत्रणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विधनासभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.

विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कशा पद्धतीने बेजबाबदारपणे वागत आहे, हे समोर आले आहे. राज्यातील सर्व बँकांची काल मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाली. त्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. परंतु राज्यात आजही राष्ट्रीयीकृत बँकांनी 25 टक्क्यांच्यावर कर्ज शेतकऱ्यांना दिलेलं नाही. सीबील सक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. परंतु सगळ्या बँका सीबील सक्ती करतायेत. एकाही अधिकाऱ्यावर कारवाई होत नाहीये. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार जीएसटी सारख्या महत्त्वाच्या काउन्सिलच्या बैठकीला गैरहजर राहतात. आपल्या राज्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तीन चाकी सरकार बेजबाबदारपणे काम करत आहेत, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.

पुण्यातील पोर्शे कार अपघातप्ररकरणी सुरुवातीला कशा प्रकारे गुन्हे दाखल झाले. आणि नंतर कशी कारवाई झाली हे सर्वांना माहिती आहे. नीट परीक्षेसह तलाठी परीक्षेतही गैरप्रकार होत आहेत. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. डोंबिवलीत दोनवेळा स्फोट होऊन अनेकांचा जीव गेला. पण सरकार बेजबाबदारपणे वागत आहे. कोस्टल रोडला गळती सुरू झाली आहे. अटल सेतूला भेगा पडल्या आहेत. राज्यातील तरुणांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे. पोलीस, विद्युत, महसूल विभागाच्या भरतीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतोय. राज्य सरकार याकडे डोळे झाकून बघतेय. म्हणून हे अधिवेशन महायुती सरकारला बाय बाय करणारे ठरणार आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण विरोधी पक्ष मिळून अधिवेशनात या सरकारचे पूर्ण वाभाडे बाहेर काढू. एक जेल कंपनी महाराष्ट्रात येणार होती, ती आता मध्य प्रदेशात गेली आहे. महाराष्ट्राला अधोगतीला हे सरकार नेत असेल तर या सरकारच्या चहापानावर आमचा बहिष्कार आहे. अधिवेशनात सरकारला जबाव विचारल्याशिवाय राहणार नाही, असा अंबादास दानवे यांनी ठणकावले.

अभद्र युती म्हणजेच अनैतीक संगतीचे सरकार – विजय वडेट्टीवार

चहापानाचं निमंत्रण आम्हाला मिळालं. परंतु महायुतीच्या सरकारने या राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे. अभद्र युती म्हणजेच अनैतीक संगत राज्याला पाहायाला मिळतेय. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. राज्यातील अथवा केंद्रात सत्तेत असलेल्या फुगलेल्यांच्या छातीतील हवा काढण्याचे काम मतदारांनी केले. त्या मतदारांचे मनापासून आभार मानतो. हे 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आणि जनाधार गमवलेलं हे सरकार आहे. आता लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षांची अवस्था महाराष्ट्राने पाहिली, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या कर्मभूमीत दोन वर्षांपूर्वी भाजपने लोकशाहीचा गळा आवळला. बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन केला. म्हणूनच जनतेने या निवडणुकीत गद्दारांना दिलं. हुकूमशाही फार काळ टिकणार नाही, हा संदेश महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने दिला, असे वडेट्टीवार म्हणाले.

हे विश्वासघातकी सरकार आहे. उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव देण्याची वल्गना केली. ही एक मोठी जुमलेबाजी आहे. सरकारने कुठल्याही शेतीमालाला दीडपट हमीभाव दिलाच नाही. 2013 मध्ये सोयाबीनला जे दर मिळत होते. तेच दर 2024 मध्ये मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना फसवण्याचे काम या महापापी महायुतीने केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीतून धडा शिकतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मागणी करतील अशी अपेक्षा होती. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

एमएसपीमध्ये फक्त सात ते आठ टक्क्यांची वाढ करण्यात आली. कापूस 7 टक्के, तूर 8 टक्के, ज्वारी 6 टक्के आणि मक्यात 6.5 टक्के एमएसपी वाढ करण्यात आली. पण या उलट बीयाणांमध्ये 35 ते 38 टक्के वाढ झाली. खतावर जीएसटीमुळे 35 टक्के आणि शेती अवजारांच्या जीएसटीमध्ये प्रचंड वाढ झाली. हे नतद्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर, बीयाणांवर, ट्रॅक्टर आणि शेतीउपयोगी अवजारांवर जीएसटी लावला जातो. दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदीसाठी पाच टक्के जीएसटी, हिरे खरेदीसाठी तीन टक्के जीएसटी, सोनं खरेदी करताना दोन टक्के जीएसटी लावला जातो. म्हणजेच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे. कमिशन खोर आणि टक्केवारी सरकारला भानही राहिले नाही. अंत्यविधीच्या प्रत्येक सामानावर 18 टक्के जीएसटी यांनी लावला. अंत्यविधीचं सामान यांनी महाग केलं. सरकारने मरणही महाग केलं आहे, अशी जोरदार टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

पत्रकार परिषदेपूर्वी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज मुंबई येथे पार पडली. बैठकीला काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी काँग्रेस नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, अबू आझमी उपस्थित होते.