मतदारांना मूलभूत सुविधा देण्यात दिरंगाई नको, कंत्राटदारांना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर किमान सुविधा योग्यप्रकारे पुरविल्या जाव्यात. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सोयीसुविधा देण्यात कोणतीही दिरंगाई करू नका, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत. तसेच मतदान केंद्रांवरील सोयीसुविधांची पूर्तता, गुणवत्ता आदींचे परीक्षण करण्यासाठी पाचसदस्यीय पथक कार्यरत राहील, अशी माहितीही त्यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा क्षेत्रातील विविध मतदान केंद्रांवर सोयीसुविधा पुरविणाऱ्या कंत्राटादारांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी गगराणी बोलत होते. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, डॉ. अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, अभिजित बांगर, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सर्व परिमंडळांचे उपआयुक्त आणि संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीवेळी काही मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधांबाबत मतदारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची भारत निवडणूक आयोग तसेच राज्य निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. या उत्तम गुणवत्तेच्या किमान सुविधा योग्यप्रकारे पुरविण्याची जबाबदारी संबंधित नियुक्त कंत्राटदारांचीही आहे. निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे कंत्राटदारांनी केवळ व्यावसायिक विचार न करता या राष्ट्रीय कार्यात आपले उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहनही गगराणी यांनी यावेळी केले.

उपायुक्त, अभियंत्यांवर जबाबदारी

निवडणूक यंत्रणा आणि सुविधा देणारे कंत्राटदार यांच्यात योग्य समन्वय राहावा यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबतच महानगरपालिकेचे सर्व परिमंडळीय उपायुक्त यांचे सहकार्य राहील. मतदान केंद्रांवर सर्व सुविधा तयार असल्याची खात्री उपायुक्त करतील. तसेच मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पूर्तता आणि गुणवत्ता तपासण्यासाठी 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये महानगरपालिकेच्या 26 प्रशासकीय विभागांतील (वॉर्ड) यांत्रिकी, विद्युत, स्थापत्य, घनकचरा व्यवस्थापन, परिरक्षण आदींशी संबंधित वरिष्ठ स्तरावरील पाच अभियंत्यांचा समावेश असलेले पथक नेमण्यात आले आहे.