विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी, माहीम मतदारसंघात रोड शो, तर वांद्रे पूर्व येथे सभेत सहभागी होत प्रचाराचा धडाका लावला. यावेळी सर्वसामान्यांकडून रोड शोला तसेच सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. वरळी येथील रोड शोमध्ये रश्मी ठाकरेही सहभागी झाल्या होत्या.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने वरळी मतदारसंघात वरळी गाव बस डेपो ते करी रोड नाक्यापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीचे मुख्य आकर्षण वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे होत्या. यावेळी मतदारांनी रस्त्यावर उतरून तसेच घराच्या खिडकीतून आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही हात उंचावत शुभेच्छांचा स्वीकार केला. ज्येष्ठांनीही हात उंचावत आदित्य ठाकरे यांना आशीर्वाद दिले. यावेळी शिवसेना उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर ही रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
View this post on Instagram
माहीम मतदारसंघात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीलाही मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांना जवळून पाहण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी तरुणांची गर्दी होत होती. माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारासाठी माहीम मच्छीमार कॉलनी ते प्रभादेवी शाखा क्रमांक 194 पर्यंत अशी प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीत शिवसेना सचिव साईनाथ दुर्गेही सहभागी झाले होते.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्या प्रचारासाठी वांद्रे पूर्व स्थानकाजवळ घेतलेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहत मतदारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईही व्यासपीठावर उपस्थित होते. सभेसाठी मुस्लिम मतदारांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.