सांगलीत आचारसंहितेची कडक अंमलबजावणी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची माहिती

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहे. निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून, कुणाचीही गय केली जाणार नाही, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सांगली जिह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत 2482 मतदान केंद्र असून, 24 लाख 22 हजार 509 मतदारांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ‘निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याची आदर्श आचारसंहिता मंगळवारपासून लागू झालेली आहे. निवडणुकीची अधिसूचना 23 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करणे. 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार असून, माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर आहे. 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. आठ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, संपूर्ण तयारी झाली आहे.’

अंतिम मतदार यादी सर्व मतदारसंघांमध्ये व सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये सर्व मतदारांनी आपली नावे यादीमध्ये आहेत का, हे तपासून पाहावे. ज्या मतदारांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. त्या मतदारांनी मतदार नोंदणी ऑनलाइन अथवा परिपूर्ण अर्ज सर्व तहसीलदार कार्यालयात कागदपत्रांच्या पुराव्यासह देण्यात यावेत.

निवडणूक लढविणाऱया उमेदवारांना वेळोवेळी खर्चाचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकटीकरणासाठी साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दयानिधी यांनी केले आहे. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत उपस्थित होत्या.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार संख्या

मतदारसंघ आणि मतदार संख्या ः मिरज- 3,41,787. सांगली- 3,54,858. इस्लामपूर- 2,79,691. शिराळा- 3,05,208. पलूस-कडेगाव- 2,91,613. खानापूर- 3,47,813. तासगाव-कवठेमहांकाळ- 3,11,340. जत- 2,90,199.

n सांगली जिह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत 2482 मतदान केंद्र असून, 24 लाख 22 हजार 509 मतदारांचा समावेश आहे.