कुलाबा मतदारसंघात एका धार्मिक सभागृहात असलेले मतदान केंद्र दूरवर हलवण्यात येत असल्याने स्थानिक मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्या केंद्राच्या अखत्यारीतील मतदानाची टक्केवारीही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरहू मतदान केंद्र स्थलांतरित करू नये, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
कुलाबा विधानसभेतील कांबेकर स्ट्रीट कच्छी मेमन जमातखाना हॉल येथील मतदान केंद्र क्रमांक 84, 85, 86, 93, 105 व 106 तसेच कांबेकर स्ट्रीट, हलाई मेनन खांडवाणी जमात हॉल येथील मतदान केंद्र क्र. 89 व 90 ही मतदान केंद्रे धार्मिक सभागृहांमध्ये असल्यामुळे ती स्थलांतरीत करून दाणा बंदर, सुरत स्ट्रीट येथील बी.पी.टी. गोडाऊन येथे न्यावीत असा प्रस्ताव आहे.
नवीन जागी सुचविण्यात आलेली मतदान केंद्रे मतदारांच्या घरांपासून इतकी दूर आहेत की, वाहनाशिवाय तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. रेल्वे लाईन ओलांडूनच मतदारांना तिथपर्यंत पोहोचावे लागेल. मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असताना दूरवर मतदान केंद्र नेणे म्हणजे मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. महाराष्ट्रात अनेक मतदान केंद्रे ही कोणत्या ना कोणत्या समाजाच्या, धर्माच्या कार्यालयात, सभागृहात किंवा शिक्षण केंद्रांत आहेत. कारण सर्वच ठिकाणी मतदारांच्या घराजवळ शासकीय जागा मतदान केंद्रासाठी उपलब्ध नसते. त्यामुळे कुलाब्यातील मतदान केंद्रे धार्मिक कारणामुळे स्थलांतरित करू नयेत, अशी विनंती शिवसेनेचे कुलाबा विधानसभा प्रमुख विकास मयेकर, उपविभागप्रमुख बाजीराव मालुसरे, शाखाप्रमुख मंगेश सावंत आणि समन्वयक दिलीप करंदीकर यांनी निवडणूक अधिकाऱयांकडे पत्राद्वारे केली आहे.