विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त सुरू आहे. अशातच अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वरखेड चेकपोस्टवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये जवळपास 6 कोटी रुपये किंमतीचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरवरुन अमरावतीला जाणाऱ्या एका गाडीची वरखेड चेकपोस्टवर थांबवून तपासणी करण्यात आली. गाडीमधून तीन व्यक्ती प्रवास करत होत्या. गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये जवळपास 6 कोटी रुपये किंमतीचे सोने आणि चांदी आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली असता, कागदपत्र देण्यात संबंधित व्यक्ती असमर्थ ठरल्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व सोने-चांदी आणि गाडी जप्त केली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने-चांदी आढळून आल्याने अमरावती-वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. सोने-चांदी घेऊन जाण्यामागे संबंधीत व्यक्तींचा उद्देश काय होता. यासंदर्भात पोलिसांची सखोल चौकशी सुरू केली असून अधिक तपास तिवसा पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.