ठाण्यात निवडणूक अधिकाऱयांच्या दिमतीला मिंधे गटाच्या बगलबच्च्यांच्या गाडय़ा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या कामासाठी खासगी वाहने घेताना रीतसर निविदा काढणे गरजेचे असताना अशी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात आलेली नाही. दिवसभर इलेक्शन डय़ुटीवर असलेल्या या गाडय़ा रात्री शहरातील अनेक बारच्या बाहेर सर्रासपणे उभ्या असतात. याचा व्हिडीओ ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने व्हायरल केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शक कारभारावर ठाणेकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी भागातून लढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच निवडणूक कामासाठी चक्क खासगी वाहने घेताना मिंधे गटाच्या बगलबच्च्यांच्या गाडय़ा घेण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी केला आहे. दिवसभर निवडणूक अधिकाऱयांसाठी वापरण्यात येणाऱया या गाडय़ा रात्री हॉटेल तसेच बारच्या बाहेर उभ्या असतात. याबाबतचा व्हिडीओ जेया यांनी प्रसारमाध्यमांसमोर दाखवत याप्रकरणी आपण निवडणूक आयोग, ठाणे पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कडक उपाययोजना घेण्यात याव्यात. फक्त कायदेशीर टेंडर प्रक्रियेतील व्यावसायिक वाहनेच निवडणुकीसाठी वापरण्यात यावी. हा गैरवापर थांबवण्यासाठी तत्काळ पावले उचलली जावीत. – अजय जेया, सामाजिक कार्यकर्ता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाच्याकडून या वाहनांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोपही जेया यांनी केला आहे. ऑन इलेक्शन डय़ुटी असे बोर्डच काही गाडय़ांवर असून या गाडय़ा मिंधे गटाच्या काही पदाधिकाऱयांच्या असल्याचा आरोप होत आहे.
पैसे वाटपासाठी तर याचा उपयोग होत नाही ना?
निविदा न काढताच निवडणूक कामासाठी घेतलेल्या या वाहनांचा पैसे वाटपासाठी उपयोग तर होत नाही ना, असा सवाल नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मिंध्यांच्या बगलबच्च्यांकडून घेतलेली ही वाहने तत्काळ रद्द करून रीतसर निविदा काढून नवी वाहने घ्यावीत अशी मागणी जेया यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.