विधानसभा निवडणुकीचा प्रचार हळूहळू वेग धरू लागला आहे. भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खेकडाफेम विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ आज परंडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी यावेळी सभेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोरे उभे आहेत. आज येथील तहसिल कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या मैदानावर तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिंदे यांचे भाषण सुरू झाले तरीही मैदान भरले नव्हते, त्यातही महिलांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या सभेकडे लाडक्या बहिणींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. बहिणींचा भावावरील विश्वास उडाल्याचे यावरुन दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत भूम-परंडा मतदारसंघातून खासदार ओमराजेंना 81 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचाराला मतदारसंघात चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे एरव्ही मतदारसंघात न फिरकणारे आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघात तळ ठोकून आहेत.